
पणजी, गोवा – जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन ९ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत गोव्याची राजधानी पणजी येथे हा सोहळा पार पडणार आहे.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तर अध्यक्षस्थान पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर भूषवणार आहेत.
मानाचे पुरस्कार जाहीर
या वर्षीचे दोन प्रतिष्ठित पुरस्कार खालील मान्यवरांना जाहीर करण्यात आले आहेत :
🔹 जागतिक मराठी भूषण पुरस्कार – अनिल खवटे
गोव्याचे प्रख्यात उद्योगपती अनिल खवटे यांना उद्योगविश्वातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सिव्हिल इंजिनिअरपासून अल्कॉन एंटरप्रायझेससारख्या बहुविध उद्योगसमूहापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. बांधकाम, हॉस्पिटॅलिटी, वाहनक्षेत्र, सिमेंट उद्योग अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेले खवटे शिक्षण व सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत.
🔹 मराठी जीवनगौरव पुरस्कार – महेश मांजरेकर
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुमुखी दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना ‘मराठी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
अस्तित्व, नटसम्राट, वास्तव, सिटी ऑफ गोल्ड यांसह काँटे, कुरुक्षेत्र, दबंग ३ सारख्या चित्रपटांत त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनयाची छाप पाडली आहे.
OTT माध्यमावरही त्यांचे दिग्दर्शन प्रेक्षकप्रिय ठरले आहे. राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मान्यतांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
तीन दिवसांचे वैविध्यपूर्ण सत्र
संमेलनादरम्यान कर्तबगार मराठी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती, संवाद सत्रे, जीवनप्रवासातील प्रेरक कथा, तसेच गोव्याच्या स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत.
संमेलनाचे कार्याध्यक्ष दशरथ परब तसेच अनिल सामंत आणि रमेश वंसकर यांच्या नेतृत्वाखाली तयारी जोरात सुरू असल्याचे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.