
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असताना, सामान्य मतदारांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रस्थापित राजकीय पक्ष दुर्लक्ष करत असल्याची टीका भारतीय माइनॉरिटीज सुरक्षा महासंघाने केली आहे. संघटनेचे पुणे शहराध्यक्ष तौसिफ अब्बास शेख यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली की महासंघ पुणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणार आहे.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला अकिल पठाण, अस्लम सय्यद, अब्बू बकर सकलेनी, संतोष शिंदे, मयूर गायकवाड, अश्फाक खान आणि अवेज नाकेदार यांसह महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हाजी मस्तान मिर्झा यांनी स्थापन केलेला महासंघ
तौसिफ शेख यांनी सांगितले की भारतीय माइनॉरिटीज सुरक्षा महासंघाची स्थापना 1983 च्या दशकात हाजी मस्तान मिर्झा यांनी केली होती. आज या महासंघाचे देशभर जाळे विस्तारले असून संघटना फक्त मुस्लिम समाजासाठी नसून सिख, ख्रिश्चन, दलित आणि इतर सर्व अल्पसंख्याक समाजांच्या प्रश्नांसाठी कार्यरत आहे.
सामान्य नागरिकांना प्रतिनिधित्व न मिळण्याची खंत
प्रस्थापित राजकीय पक्ष आर्थिकदृष्ट्या मजबूत उमेदवारांना संधी देत असल्याने सामान्य नागरिक मागे पडतात, असेही शेख यांनी सांगितले. शहरातील पाणी, वाहतूक, झोपडपट्टी, रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष पाहता महासंघाने निवडणूक रिंगणात उतरायचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात मजबूत संघटन रचना
पुणे शहरातील प्रत्येक मतदारसंघात महासंघाचे कार्यकर्ते कार्यरत असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींचा अभ्यास करून उपाययोजना ठरवल्या असल्याचे शेख यांनी सांगितले. “शहरातील सर्व प्रभागांत आमचे उमेदवार उभे राहतील,” असे त्यांनी सांगितले.