पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जाहीर; महाराष्ट्रातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1,808 कोटींची थेट जमा

पुणे, १९ नोव्हेंबर – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत 21 वा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या अंतर्गत महाराष्ट्रातील 90 लाख 41 हजार 241 पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात तब्बल 1,808 कोटी 25 लाख रुपये थेट DBT माध्यमातून जमा होत आहेत.

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती देताना सांगितले की, “रब्बी हंगामाच्या तोंडावर मिळालेला हा 21 वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीप्रमाणे ठाम उभे असून, वेळेवर मिळणाऱ्या या आर्थिक सहाय्यामुळे बियाणे, खते, लागवड आणि इतर कृषी खर्चांची तातडीची गरज भागेल,” असे त्यांनी सांगितले.

PM-KISAN या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ₹6,000 इतकी मदत दिली जाते. ही मदत ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा केली जाते. महाराष्ट्रातील कृषी विभाग, महसूल विभाग आणि बँकिंग यंत्रणा यांनी समन्वय साधून 21 व्या हप्त्याचे वितरण सुरळीत करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

कृषी मंत्री भरणे म्हणाले, “ही देशातील सर्वात व्यापक थेट आर्थिक सहाय्य योजना असून नियमित आर्थिक सहाय्यामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांना हंगामी नियोजनात मोठा दिलासा मिळतो. Aadhaar-seeding, बँक पडताळणी आणि DBT प्रक्रियेतील पारदर्शकतेमुळे योजना अधिक सक्षम झाली आहे.”

शेतकऱ्यांना आपला हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकारने अधिकृत पोर्टल आणि मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button