
मुंबई : रहस्यप्रधान कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या आगामी ‘असंभव’ चित्रपटातील ‘बहर नवा’ हे नवीन गीत प्रदर्शित झाले असून प्रदर्शित होताच प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी यांच्या सुरेल आवाजात सादर झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे, तर संगीतकार अमितराज यांनी या गीताला मनमोहक संगीताची जोड दिली आहे.
८० च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित या गाण्यात मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांच्या पात्रांमधील नव्याने फुलणाऱ्या नात्याचा कोवळा प्रवास दिसतो. नवी स्वप्ने, एकमेकांवरील विश्वास, आणि नव्या सुरुवातीची चाहूल अशा भावनांनी सजलेले हे दृश्य प्रेक्षकांना मोहून टाकत आहे. याचदरम्यान अभिनेत्री प्रिया बापटची एंट्री कथानकात गूढता निर्माण करत असून प्रेमाचा त्रिकोण की काही वेगळं रहस्य याबद्दल उत्सुकता वाढवत आहे.
गीताबद्दल बोलताना अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते सचित पाटील म्हणाले, “‘बहर नवा’ म्हणजे नात्याचं नव्यानं उमलणं… दोन मनांना जोडणारा सुरेल श्वास. सूर, शब्द आणि सादरीकरण यांच्या योग्य संगतीत या गाण्याला एक खास रंगत प्राप्त झाली आहे.”
संगीतकार अमितराज यांनी सांगितले, “हे गाणं प्रेक्षकांच्या भावविश्वाशी थेट संवाद साधतं. नात्यातील कोवळेपणा आणि भावनांचा नाजूक प्रवास संगीताद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला असून प्रेक्षकांना ही जादू नक्कीच भावेल.”
‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केले असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे चार मराठीतील गुणी कलाकार या चित्रपटात प्रथमच एकत्र झळकणार आहेत.
मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटचे सचित पाटील व नितीन प्रकाश वैद्य हे निर्माते असून एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्मितीची धुरा सांभाळत आहेत.
रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या विश्वातून उलगडणारा हा थरारक सिनेमा २१ नोव्हेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित होणार आहे.