शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण : शिक्षकांच्या अपमानामुळे घेतले धक्कादायक पाऊल; पालकांकडून कारवाईची मागणी

नवी दिल्ली / पुणे दि. 20 : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीत शिकणाऱ्या शौर्य पाटील या 16 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने दिल्लीसह महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे. मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेअडीच वाजताच्या सुमारास राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून उडी मारून शौर्यने आपल्या आयुष्याचा शेवट केला.

■ सुसाईड नोटमधील आरोप धक्कादायक

घटनास्थळी मिळालेल्या दीड पानांच्या सुसायड नोटमध्ये शौर्यने शिक्षिकांकडून वर्गात सर्वांसमोर झालेल्या अपमानामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. मानसिक छळाला कंटाळूनच हा टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्याने केला असल्याची माहिती समोर आली आहे.

■ वडिलांकडून कठोर कारवाईची मागणी

शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी शाळा प्रशासन आणि संबंधित शिक्षिकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. “माझ्या मुलाला सतत अपमानास सामोरे जावे लागत होते. शाळेने वेळेत योग्य पावले उचलली असती, तर आज माझा मुलगा जिवंत असता,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

■ पोलिसांकडून तपास सुरू

दिल्ली पोलिसांनी प्रकरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शाळेतील CCTV फुटेज, विद्यार्थ्यांचे जबाब आणि सुसाईड नोटच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. शाळा प्रशासनानेही अंतर्गत चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.

■ समाजात संतापाची लाट

एक गुणी आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी अशा रीतीने आयुष्य संपवतो, ही घटना पालक आणि समाजासाठी चिंताजनक ठरली आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण, शिक्षकांचे वर्तन आणि शाळांतील वातावरण यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button