
पुणे दि. 20 : बिहारच्या राजकारणातील अनुभवी आणि प्रभावी नेता नितीश कुमार यांनी आज दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्यकारभाराची धुरा पुन्हा एकदा आपल्या हातात घेतली. पाटण्यातील शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ मान्यवरांची उपस्थिती होती.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए-भाजप आघाडीने दमदार प्रदर्शन करत 243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय मिळवला असून, या विजयाच्या पार्श्वभूमीवर विश्वासाने भरलेला शपथविधी सोहळा पार पडला.
नव्या मंत्रिमंडळात तरुणांना संधी
नितीश कुमार यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळात 26 मंत्र्यांचा समावेश केला आहे. यात सम्राट चौधरी, विजय सिन्हा ही महत्वाची नावे असून त्याचबरोबर श्रेयसी सिंह, राम निषाद, सुरेंद्र मेहता, मंगल पांडे, नितीन नवीन, नारायण शाह, रामकृपाल, संजय टायगर, प्रमोद चंद्रवंशी, अरुण शंकर प्रसाद आणि दिलीप जैस्वाल या नेत्यांनाही मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विकास आणि प्रशासनिक स्थैर्याची हमी
शपथविधी सोहळ्यात बोलताना नितीश कुमार यांनी बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासनिक स्थैर्य, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे कार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एनडीएने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामुळे बिहारमध्ये पुढील काही वर्षे स्थिर सरकार आणि विकासाचा वेग पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.