
पुणे : कारगिल युद्धातील अतुलनीय पराक्रमासाठी सर्वोच्च वीरश्री पुरस्कार ‘परमवीर चक्र’ प्राप्त कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या आगमनाने परिसरात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने कॅप्टन यादव यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, मंगेश सूर्यवंशी, रोहित लोंढे, तसेच संजय भोसले आणि किशोर येनपुरे उपस्थित होते.
दर्शनानंतर संवाद साधताना कॅप्टन यादव म्हणाले, “दगडूशेठ हे असे गणपती बाप्पा आहेत, जे भक्ताच्या नावाने ओळखले जातात. देवतांमध्ये गणेशाचे स्थान सर्वोच्च आहे. करुणा, रिद्धी, सिद्धी आणि ज्ञानाचे ते प्रतीक आहेत. येथे आल्यावर मनाला वेगळीच शांती लाभते. गणेशाचे ज्ञान आणि संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले, “पर्यावरण आणि मानवतेला नवी चेतना देणारे दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कार्य प्रेरणादायी आहे. भारतवासीयांवर गणरायाची कृपा सदैव राहो आणि सर्वत्र सुख-शांती नांदो,” अशी त्यांनी गणेशचरणी प्रार्थना केली.
फोटो ओळ : कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे स्वागत आणि सन्मान; त्यांच्या हस्ते गणरायाची आरती.