
पुणे, ता. १९ : पाचवी ते दहावीच्या शालेय अभ्यासक्रमात वाणिज्य विषयाचा समावेश करण्यासाठी ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) वतीने सक्रिय हालचाली सुरू आहेत. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याशी झालेली बैठक सकारात्मक ठरली असल्याची माहिती डब्ल्यूआयआरसीचे अध्यक्ष सीए केतन सैय्या यांनी दिली.
यावेळी त्यांनी सीए विद्यार्थ्यांसाठी तब्बल ५०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीची मोठी घोषणा केली. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
वाणिज्य विषय शालेय पातळीवर आणण्याची तयारी
सीए केतन सैय्या म्हणाले की,
“शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये वाणिज्य विषयासाठी स्वतंत्र पाठ समाविष्ट व्हावा, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञ सनदी लेखापालांची समिती नेमण्याच्याही सूचना मिळाल्या आहेत.”
त्यामुळे लवकरच नवीन अभ्यासक्रमात वाणिज्य विषयाचा समावेश होण्याची शक्यता अधिक आहे.
५०० कोटींची शिष्यवृत्ती – आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी संजीवनी
सीए सैय्या म्हणाले,
“ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ५ लाखांखाली आहे, अशांना पूर्णपणे विनाअट शिष्यवृत्ती दिली जाते. सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा आधार आहे.”
तसेच तंत्रज्ञानातील बदल, वाढती स्पर्धा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्यावसायिक अभ्यासक्रमही राबवले जातात.
व्यावहारिक अनुभवासाठी इंटर्नशिप, कॅम्पस सिलेक्शन
पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार म्हणाले,
“विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी इंटर्नशिप उपलब्ध आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांमधून कॅम्पस सिलेक्शनही चालते. सीए अभ्यासक्रम आव्हानात्मक असला तरी विद्यार्थी वर्षातून तीन वेळा परीक्षा देऊ शकतात.”
अभ्यासक्रमातील बदल व्यवसायाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित असतील, याची काळजी घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यात डब्ल्यूआयआरसी पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, पुणेरी पगडी देऊन स्वागत
पुणे भेटीदरम्यान बिबवेवाडी येथे डब्ल्यूआयआरसीच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. या वेळी सीए पियुष चांडक, सीए जीनल सावला, सीए फेनील शहा, सीए सचिन मिणियार, सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे आदी उपस्थित होते.