
पुणे, दि. 19 नोव्हेंबर 2025 :
खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये ९ वर्षीय मुलीवर जिवंत दात्याकडून किडनी प्रत्यारोपणाची दुर्मीळ आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, या मुलीला तिच्या ६९ वर्षीय आजीकडून किडनी मिळाली असून, तीन पिढ्यांमधील निस्सीम प्रेम आणि त्यागाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
सौम्य ताप, अशक्तपणा आणि खोकल्याच्या तक्रारींसह दाखल झालेल्या या मुलीची तपासणी केली असता तिची हिमोग्लोबिन पातळी केवळ ३ g/dl आढळली. पुढील चाचण्यांमध्ये दोन्ही मूत्रपिंडे लहान आणि आकुंचित झाल्याचे स्पष्ट झाले. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या किडनी आजारामुळे तिच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितल्यानंतर आजीने तत्काळ स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
नेफ्रोलॉजी व किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे सल्लागार डॉ. मनीषकुमार माळी यांनी सांगितले,
“दाता आणि रुग्ण यांच्यातील मोठे वयान्तर ही मोठी अडचण होती. परंतु तपासणीत आजीचे आरोग्य अत्यंत चांगले आढळले. फक्त १४ किलो वजनाच्या, उच्च रक्तदाब असलेल्या मुलीवर प्रत्यारोपण करणे आव्हानात्मक होते, तरीही सर्व चाचण्या आणि प्री-अॅनेस्थेटिक मूल्यांकन पूर्ण करून शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.”
युरोलॉजी सल्लागार डॉ. आनंद धारस्कर म्हणाले,
“मुलांमध्ये किडनी प्रत्यारोपण करताना विशेष बारकाई आवश्यक असते. प्रौढ व्यक्तीची किडनी लहान पोटात बसवण्यासाठी अचूक चिरा आणि रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म टाके घेतले गेले. लॅप्रोस्कोपिक पद्धतीमुळे आजीच्या वेदना कमी झाल्या आणि त्या लवकर बऱ्या झाल्या.”
आपला अनुभव सांगताना आजी भावूक होत म्हणाल्या,
“माझ्या नातीचे आयुष्य आता सुरू होत आहे. तिचा त्रास पाहवत नव्हता. तिला वाचवण्यासाठी माझी किडनी देणे हा माझ्यासाठी देवाने दिलेला आशीर्वादच आहे.”
मणिपाल हॉस्पिटल खराडीचे हॉस्पिटल डायरेक्टर परमेश्वर दास यांनी सांगितले,
“शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांवर काटेकोर लक्ष ठेवण्यात आले. तिसऱ्या दिवशी आजीला आणि आठव्या दिवशी मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. मुलीच्या मानसिक स्थिरतेसाठी विशेष मानसशास्त्रीय मदतही देण्यात आली.”
ही शस्त्रक्रिया मणिपाल हॉस्पिटलच्या बहुविद्याशाखीय तज्ज्ञांच्या टीमने पूर्ण केली. यात डॉ. मनीषकुमार माळी, डॉ. आनंद धारस्कर, डॉ. अंकित शर्मा आणि डॉ. सुनील बोरडे यांचा समावेश होता. उत्कृष्ट समन्वय, वैद्यकीय कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दाता आणि प्राप्तकर्ता दोघांचीही प्रकृती आता सुधारत आहे.
या संपूर्ण प्रकरणातून कुटुंबातील नाते, प्रेम आणि त्याग किती शक्तिशाली असू शकतात याचे प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे.