खासदार सुप्रिया सुळे यांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे खुले पत्र; ड्रग्ज प्रकरणावर प्रतिउत्तर

पुणे दि. 19 : धाराशिवमधील ड्रग्ज प्रकरण आणि तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यात चांगलाच राजकीय वाद रंगला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने केलेल्या टीकेला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी थेट खुले पत्र लिहून उत्तर दिले आहे.
“तुम्ही केलेले आरोप चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यतेतून केलेले आहेत,” असा आरोप पाटील यांनी सुळे यांच्यावर केला आहे.

दरम्यान, संतोष परमेश्वर यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते, असा दावा आमदार पाटील यांनी स्पष्टपणे केला आहे.

आमदार राणा पाटील यांच्या खुल्या पत्रातील प्रमुख मुद्दे
नात्याचा आदर पण आरोपांवर नाराजी

पत्राच्या सुरुवातीलाच पाटील यांनी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी असलेले नाते जपले आहे. “आपण माझ्या थोरल्या बहिणीसारख्या आहात,” असे म्हणत त्यांनी सुळे यांच्या वक्तव्यांना राजकीय अपरिहार्यता म्हणून उल्लेख केले.

ड्रग्ज प्रकरण: ‘वस्तुनिष्ठ माहिती न घेता आरोप’

सुळे यांनी तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणावर केलेली वक्तव्ये वस्तुनिष्ठ माहिती न घेता केली गेली असल्याचा आरोप पाटील करतात.
ते पुढे म्हणतात—

निवडणुकीदरम्यान स्थानिक महिलांनी त्यांना ड्रग्जचा मुद्दा सांगितला.

त्यांनी स्वतः माजी जिल्हा पोलिस अधीक्षकांना iMessage करून माहिती पुरवली.

स्थानिक गुन्हे शाखेसाठी विनोद गंगने यांना जोडून दिले.

पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच आरोपी केले, असेही त्यांनी नमूद केले.

न्यायालयानेही जामीन मंजूर करताना हे मुद्दे अधोरेखित केले, असा दावा.

संतोष परमेश्वर भाजप प्रवेश

पाटील म्हणतात,
“भाजप प्रवेश करायच्या क्षणापर्यंत संतोष परमेश्वर हे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते होते. ड्रग्जप्रकरणात आरोप लागल्यानंतरही तुम्ही त्यांना पक्षातून काढले नव्हते.”

शताब्दी रुग्णालय निविदा प्रकरण

अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांवरही पाटील यांनी उत्तर दिले.
“तेरणा ट्रस्टने केवळ निविदेत सहभाग घेतला आहे. आधी कोणीही पुढे न आल्याने तिसऱ्या वेळी ट्रस्टने अर्ज केला. यात चुकीचे काय?” असा त्यांचा प्रश्न सुळे यांना उद्देशून.

“बोलायला तयार आहे” — पाटील यांचे खुले आव्हान

पत्राच्या शेवटी ते लिहितात,
“आपल्याला अजून शंका असतील तर माझी पूर्ण तयारी आहे. चर्चा करून सर्व पुरावे दाखवण्यास मी तयार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button