निसर्गोपचार ही माणूस–निसर्गातील समतोल साधणारी जीवनशैली : राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे : “निसर्गोपचार ही केवळ उपचारपद्धती नसून माणूस आणि निसर्ग यांच्यातील संतुलन जपणारी जीवनशैली आहे. निरोगी, आत्मनिर्भर आणि अध्यात्मिक मूल्यांवर आधारलेला समाज निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेला निसर्गोपचाराचा वैचारिक वारसा आजही तितकाच महत्त्वाचा आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे (NIN) आठव्या निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाचा समारोप येवलेवाडी येथील निसर्गग्राम परिसरात झाला. या कार्यक्रमात केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल सुचिता जोशी, आणि NINचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह व्यासपीठावर उपस्थित होते.

समारोप सोहळ्यात राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या पुस्तकरूप पुस्तकाचे तसेच संस्थेवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय १५६ व्या गांधी जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला.

कार्यक्रमाला भेट देताना राज्यपालांनी, “महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीशी जोडलेल्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेत येणे हा आनंदाचा विषय आहे. निसर्गाशी सुसंगत राहणे आणि त्या आधारे आरोग्य-संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.

नैसर्गिक आहार, जीवनशैलीतील संतुलन आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देत तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button