पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्यावर NIT श्रीनगरच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी

पुणे : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) चे संस्थापक आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) जम्मूचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्यावर आता आणखी एका प्रतिष्ठित संस्थेची धुरा सोपवण्यात आली आहे. महामहिम राष्ट्रपती यांच्या मंजुरीने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) श्रीनगरच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून ते IIM जम्मूचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली संस्थेचा नवीन कॅम्पस वेगाने विकसित होत आहे. व्यवस्थापन शिक्षण, उद्योग क्षेत्र आणि धोरणनिर्मिती यामध्ये त्यांचा व्यापक अनुभव लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

यासोबतच पद्मश्री कांबळे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध उच्चस्तरीय समित्यांवर सल्लागार म्हणूनही काम पाहतात. उद्योगातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे, सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण आणि आधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारणी याबाबत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ देशभरातील संस्था घेत आहेत.

NIT श्रीनगरच्या पुढील शैक्षणिक आणि अधोसंरचनात्मक प्रगतीत त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे, अशी व्यापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button