हिवाळ्यात टाचा फाटण्याच्या तक्रारी वाढल्या; घरगुती उपायांनी मिळू शकते त्वचेचा त्रासावर मात

पुणे : हिवाळ्याच्या सुरुवातीस तापमानात घट होताच कोरड्या हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून टाचा फाटण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, टाचा फाटणे ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या असून वेळेवर काळजी घेतल्यास हा त्रास सहज टाळता येऊ शकतो.

या दिवसांत पायांची अतिरिक्त निगा राखणे गरजेचे असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ सांगतात. आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चराइझिंग क्रीम किंवा व्हॅसलीन लावणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. त्याचबरोबर ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचे मिश्रण, खोबरेल तेल यांसारखे घरगुती उपायही पायांना आवश्यक ओलावा देत त्वचा मऊ ठेवतात.

पायांची स्वच्छता राखणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एकदा कोमट पाणी, मीठ किंवा शॅम्पू वापरून पाय मऊ करून, त्यानंतर प्यूमिस स्टोनने हलके घासल्यास मृत त्वचा दूर होण्यास मदत होते.

तज्ज्ञ सांगतात की चुकीची पादत्राणेही टाचा फाटण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. मागे उघड्या चपला किंवा सॅन्डल वापरल्यास धूळ आणि कोरडी हवा टाचांवर परिणाम करतात. त्यामुळे पायांना आधार देणारी आणि टाचांना संरक्षण देणारी पादत्राणे निवडण्याचा सल्ला दिला जातो.

शरीरातील पाण्याची कमतरता देखील त्वचा कोरडी होण्यामागचे एक कारण असल्याने पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

दरम्यान, टाचा खूप फाटणे, रक्त येणे किंवा तीव्र वेदना जाणवल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

हिवाळ्यातील या सर्वसाधारण समस्येवर योग्य काळजी आणि साध्या उपायांनी प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button