
पुणे दि. 19 : मराठी चित्रपटसृष्टीला तांत्रिकदृष्ट्या नवी उंची गाठणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सर्वत्र प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वर्ड ऑफ माऊथच्या जोरावर या चित्रपटाचे शोज वाढवण्यात येत असून, तांत्रिक प्रयोगांच्या दृष्टीने हा चित्रपट आता इतिहासात नोंदवला गेला आहे.
भारतातील पहिलाच २५ मिनिटांचा वन-टेक सीन
‘गोंधळ’च्या पहिल्या हाफमध्ये तब्बल २५ मिनिटांचा अखंड, अविरत वन-टेक सीन चित्रीत करण्यात आला असून भारतीय चित्रपटसृष्टीत अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. या विक्रमासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण युनिटने तब्बल सात दिवसांचे सलग चित्रीकरण करून हा सीन परिपूर्ण केला.
या भव्य टेकसाठी दररोज ३०० पेक्षा जास्त जुनिअर आर्टिस्ट, पौने किलोमीटरपेक्षा जास्त लाइटिंग सेटअप, पाच जनरेटर, तसेच पेट्रोलचे तीन टँकर इतका मोठा तांत्रिक आणि मानव संसाधनांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
या अनुभवाबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले,
“प्रत्येक वायर, प्रत्येक फोकस आणि प्रत्येक लाइटच्या तापमानावर आमची कसोटी होती. इतका मोठा सीन एकाच टेकमध्ये सुरळीत पार पडणं म्हणजे जादूसारखंच आहे. संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळेच हे शक्य झालं.”
आंतरराष्ट्रीय स्तराशी स्पर्धा करणारं धाडस
वन-टेक शैलीला ‘बर्डमॅन’ (2014) आणि ‘1917’ (2019) सारख्या ऑस्कर विजेत्या चित्रपटांनी जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. ‘गोंधळ’चा २५ मिनिटांचा वन-टेक हा त्याच धाडसाचा मराठी चित्रपटविश्वातील प्रत्ययकारी नमुना ठरला आहे.
कथा – भावना, संघर्ष आणि नात्यांचा रोलर-कोस्टर
‘गोंधळ’ ही कथा महाराष्ट्राची परंपरा, मानवी भावविश्वाची गुंतागुंत, नातेसंबंधातील ताणतणाव आणि परिस्थितींच्या रोलर-कोस्टरवर आधारित आहे. दमदार कथानक, उत्कट अभिनय आणि भव्य स्केल यामुळे चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः दिग्दर्शक संतोष डावखर यांनी लिहिले असून, डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत.
भक्कम कलाकारांची फळी
किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके या नामवंत कलाकारांनी ‘गोंधळ’मध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत नवा अध्याय लिहिणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट प्रेक्षकांना तांत्रिकदृष्ट्या अनोखा अनुभव देत असून, नव्या प्रयोगशीलतेची मराठी चित्रपटकडे असलेली ताकद पुन्हा एकदा अधोरेखित करतो.