वेद भारतीय संस्कृतीचा आत्मा : परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

पुणे,दि.१८ : भारतीय संस्कृती ही वेदमूलक असून वेदज्ञानाच्या उपासनेतूनच भारत एक दिवस विश्वगुरू होईल. “वेद हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे,” असे प्रतिपादन अयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री आणि वेदोपासक अशोक सिंघल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘भारतात्मा अशोक सिंघल वेद पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

बीएमसीसी रोडवरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात २०२५ चे वेद पुरस्कार प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट वेद विद्यार्थी पुरस्कार हैदराबादचे श्री नोरी केदारेश्वर शर्मा, आदर्श वैदिक शिक्षक पुरस्कार चेन्नईचे श्री अनंत कृष्ण भट्ट, तर सर्वोत्कृष्ट वैदिक संस्था पुरस्कार राजमहेंद्रवरम (आंध्र प्रदेश) येथील श्री दत्तात्रेय वेद विद्यालयाला देण्यात आला. अनुक्रमे तीन लाख, पाच लाख आणि सात लाख रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सिंघल फाउंडेशनचे मार्गदर्शक रवींद्र मुळे, मुख्य विश्वस्त संजय सिंघल, तसेच सलिल सिंघल उपस्थित होते.

“वैदिक विद्वानांचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा सन्मान” – स्वामी गिरीजी

देशात कलाकार, साहित्यिकांचा सन्मान होत असला तरी वेदपरंपरा जपणाऱ्या वैदिक विद्वानांचा योग्य गौरव होत नाही, असे सांगताना स्वामी गिरीजी म्हणाले :

“वैदिक विद्वान सर्वाधिक परिश्रम करतात. वैदिक विद्वानांचा आदर करणे म्हणजे राष्ट्राचा आदर करणे.”

गेल्या काही वर्षांत वेद आणि वैदिक परंपरेचे महत्व वाढले असले, तरी त्याची पुनर्प्रतिष्ठापना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. वेदप्रसारकांचा सन्मान करणे हे सिंघल फाउंडेशनचे अतिशय समाधानकारक कार्य असल्याचे ते म्हणाले.

“वेद निष्काम कर्म शिकवतात” – आचार्य प्रद्युम्नजी महाराज

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना परमपूज्य आचार्य श्री प्रद्युम्नजी महाराज म्हणाले :

वेद निष्काम कर्माचा संदेश देतात

स्वतःच्या सुखाचा त्याग करून समाजात ज्ञान प्रवाहित करणे हेच खरे वेदकर्म

वेद आत्मसात करणे म्हणजे वेदांना समर्पित होणे

यशस्वी आयुष्यासाठी शास्त्रवचन आणि गुरुकार्यातील निष्ठा अत्यावश्यक

अशोक सिंघल यांच्या कार्याला पुढे नेणारा उपक्रम

प्रास्ताविकात संजय सिंघल म्हणाले की, अशोक सिंघल यांचे जीवन म्हणजे वेद आणि राममंदिर चळवळीची गाथा आहे. वेदप्रसारासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून या पुरस्कारांची संकल्पना मांडण्यात आली.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी या पुरस्कारांना ‘भारतात्मा’ हे नाव देण्याची सूचना केली होती, हे त्यांनी नमूद केले. हा पुरस्कार उपक्रम भविष्यातही सातत्याने चालू ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा प्रारंभ आणि सूत्रसंचालन

कार्यक्रमाची सुरुवात वेदवंदनेने झाली. पाहुण्यांचे स्वागत, जूरी सदस्यांचा सन्मान आणि शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन संजय सिंघल यांनी केले. सूत्रसंचालन शुभम शर्मा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button