‘मन धावतंया’ फेम राधिका भिडेचं ‘उत्तर’ मधून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण! संगीतकार अमितराज यांची रचना “हो आई!” प्रत्येकाच्या प्लेलिस्टवर

सध्याचा भारतभर धुमाकूळ घालणारा आणि तरुणाईचा लाडका मराठमोळा आवाज म्हणजे ‘मन धावतंया’ फेम राधिका भिडे! या लोकप्रिय गायिकेचं पहिलंवहिलं मराठी चित्रपट गीत “हो आई!” सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘उत्तर’ या मराठी चित्रपटातील या प्रमोशनल सॉंगमध्ये आई-मुलाच्या नात्यातील सहज, गोड आणि भावूक केमिस्ट्री अप्रतिमपणे उलगडली आहे. ‘तू आहेस म्हणून मी आहे’ ही भावना सोप्या शब्दात आणि सुंदर चालीत प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचविणारे हे गाणे रसिकांची उत्सुकता आणखी वाढवत आहे.

सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या गीताला अमितराज यांनी संगीत दिले आहे. या हिट जोडीने यापूर्वी ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘माझ्या राजा रं’ आणि ‘तुला जपणार आहे’ यांसारखी सुपरहिट गाणी दिल्याने त्यांच्या नव्या गाण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती.

राधिकाच्या सुमधुर आवाजात साकारलेलं “हो आई!” हे कोमल, भावस्पर्शी गाणं प्रत्येकाला आपल्या आईबद्दलच्या भावनांना शब्द देण्याची आणि तिला ‘थँक यू’ म्हणण्याची संधी देत आहे.

झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित ‘उत्तर’ या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाचे निर्माते उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर, मयूर हरदास आणि संपदा वाघ आहेत.

हा अत्यंत भावनिक आणि नात्यांचे पैलू दाखवणारा चित्रपट १२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button