
पुणे, दि. 18 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित भव्य मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्त्रीशिक्षणाची गंगोत्री उघडणाऱ्या या क्रांतिकारी दाम्पत्याने दीडशे वर्षांपूर्वी समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद आणि महिलांवरील अन्यायाविरोधात एल्गार पुकारला. महिलांना ‘चूल आणि मूल’ या चौकटीत बंदिस्त करणाऱ्या समाजव्यवस्थेला आव्हान देत फुले दाम्पत्याने शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, घरच्यांचा विरोध आणि समाजाकडून होणारा दुहेरी रोष सहन करत सावित्रीबाई आणि जोतीबा फुले यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर स्त्रीशिक्षणाचा पाया भक्कम झाला. त्यांच्या या ऐतिहासिक योगदानाची ओळख नव्या पिढीपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचावी, या उद्देशाने ही मालिका प्रेक्षकांसमोर येत आहे.
मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीबा फुले यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली असून ऐतिहासिक घटनांचा भव्यदिव्य सादरीकरणातून प्रेक्षकांना एक प्रेरणादायी प्रवास अनुभवायला मिळणार आहे.
स्टार प्रवाहची ही नवी मालिका समाजपरिवर्तनाचा इतिहास नव्या रूपात मांडत प्रेक्षकांवर लवकरच प्रभाव टाकणार आहे.