
पुणे दि. 18 : नृत्यांगना आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एका नवीन आणि भव्य डान्स ड्रामा – “संभवामि युगे युगे” मधून येत आहे. या प्रकल्पात ती भगवान श्रीकृष्णाचा अवतार साकारणार असून, तिचा हा दिव्य लूक प्रेक्षकांना अक्षरशः मोहवून टाकणारा आहे.
संस्कृतीने अनेक मुलाखतींमध्ये श्रीकृष्णाशी असलेल्या तिच्या भावनिक नात्याबद्दल बोलले आहे. याच जोडणीमुळे हा प्रोजेक्ट तिच्या मनाच्या अधिक जवळचा असल्याचे ती सांगते. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या कृष्ण-लूकचे प्रेक्षकांनी केलेले कौतुक पाहता, आज संस्कृतीने आणखी एक नवा कृष्णरूपातील फोटो शेअर करत लिहिले —
“मंचावर कृष्णाला साकारण्याची संधी मिळतेय, यापेक्षा मोठं भाग्य आणखी काय?”
या प्रकल्पाच्या माध्यमातून संस्कृतीची दोन मोठी स्वप्ने पूर्ण होत आहेत—
कृष्णरूप साकारण्याची संधी, आणि तिच्या आवडत्या अभिनेत्यासोबत काम करण्याचा मान.
विशेष म्हणजे, या शोमध्ये अभिनेता सुमित राघवन संस्कृतीने साकारलेल्या कृष्णरूपाला आवाज देणार असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे हा प्रोजेक्ट संस्कृतीसाठी आणखी खास ठरतो आहे.
संस्कृतीने आजवर अनेक कलाकृतींमधून रसिकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता तिच्या या कृष्णरुपी अवताराची झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
