
मुंबई दि. 18 : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांनी परखड भूमिका मांडत कठोर प्रतिक्रिया दिली आहे.
“मला अभिमान आहे. मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते,” असे तीव्र वक्तव्य करत त्यांनी शासनावर निशाणा साधला. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून शिवरायांच्या नावाचा केवळ राजकीय उपयोग केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज दिसतात. किल्ल्यावर नमो सेंटर उभारायचे, किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही होऊ देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांना शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ मिळाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
तसेच “1800 कोटींचा जमीन घोटाळा होतो पण गुन्हा होत नाही” असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरही टोलाही लगावला.
राज्यातील किल्ल्यांवरील अनियमिततेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी विचारले, “वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीला कोण परवानगी देते? झोपड्या बांधायला परवानगी कोण देतं? तिकडे पोलिस दिसत नाहीत का?”
राज-उद्धव एकत्र लढण्याच्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत म्हणाल्या, “दोन्ही बंधू एकत्र येऊन निवडणूक लढले तर उत्तमच.”
यासोबतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विलंबित सुनावण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस तीन वर्षे सुरू आहे. निकाल जानेवारीत येणार म्हणे, तेव्हा निवडणुका संपतात. तुम्हाला खात्री असेल तर मैदानात या आणि निवडणूक लढा,” असे आव्हान त्यांनी दिले.