सौदीत भीषण बस अपघात : उमराहहून परतणाऱ्या 42 भारतीय तीर्थयात्रींचा संभाव्य मृत्यू

पुणे, दि. 17 : सौदी अरेबियातील बद्र–मदिना महामार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला असून यात मोठ्या संख्येने भारतीय तीर्थयात्रींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मक्का येथे उमराहची धार्मिक विधी पूर्ण करून मदीना येथे जात असताना त्यांच्या बसचा डिझेल टँकरशी जोरदार अपघात झाला. धडकेनंतर तात्काळ प्रचंड स्फोट होऊन बसला आग लागली आणि अनेक प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले.

हा अपघात भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता घडला. प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये तेलंगणा आणि हैदराबाद परिसरातील भारतीय नागरिक प्रवास करत होते. सुमारे 42 भारतीयांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता स्थानिक सूत्रांनी व्यक्त केली आहे. मृतांमध्ये 20 महिला आणि 11 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सौदीतील स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

या दुर्घटनेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त करत तात्काळ मदतकार्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि कुटुंबीयांना सर्व माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारकडून विशेष कंट्रोल रूम स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाशी सातत्याने संपर्क राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

ही दुर्घटना अत्यंत भीषण असून मृतांची अधिकृत संख्या आणि ओळख अद्याप जाहीर होणे बाकी आहे. कुटुंबीयांमध्ये मोठी शोककळा पसरली असून मदतकार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button