जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ३७८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे उपक्रम

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ३७८ विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सुर्यकांत पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, विजय भालेराव तसेच डॉ. संजीव डोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात

२९८ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

२३१ विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.

“कर्तृत्वाचे मूल्य पैशात मोजता येत नाही” — सूर्यकांत पाठक

यावेळी बोलताना सूर्यकांत पाठक म्हणाले, “समाजात गुणवत्तापूर्ण कार्याची किंमत नेहमीच अधिक असते. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त, पालकत्व योजनेतील शिक्षक व डॉक्टर यांचे योगदान अमूल्य आहे. हे कार्य पैशात मोजता येत नाही. विद्यार्थी मोठे झाल्यावर त्यांनीही समाजोपयोगी कार्य करून या संस्कारांची परंपरा पुढे न्यायावी.”

“शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात देशाला पुढे नेण्याची गरज” — महेश सूर्यवंशी

या योजनेबाबत बोलताना महेश सूर्यवंशी म्हणाले,
“सन २०१० पासून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक विकासाबरोबरच आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. भारत विश्वगुरु व्हायचा असल्यास शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य करणे गरजेचे आहे. म्हणूनच डोळे, दात तसेच सर्वांगीण आरोग्य तपासणी दरवर्षी केली जाते व त्यांचे रेकॉर्डही जतन केले जाते.”

ते पुढे म्हणाले, “मुलांनी नियमित व्यायाम, चांगला आहार आणि मानसिक तणाव व्यवस्थापन ही तीनही तत्त्वे आत्मसात करावीत, यासाठी शिबिरात मार्गदर्शन केले जाते.”

विद्यार्थ्यांचे अनुभव

तन्मय कबाडे, विद्यार्थी —
“२०१७ मध्ये या योजनेत आलो. घरी सुविधा मर्यादित होत्या, पण स्वप्न मोठी होती. योजनेने मला ‘तू सक्षम आहेस’ ही जाणीव दिली. आज मी निरोगी आरोग्य आणि आत्मविश्वासाने डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. हे सर्व दगडूशेठ गणपती ट्रस्टमुळेच शक्य झाले.”

श्रद्धा चिन्नी, विद्यार्थीनी —
“इयत्ता २रीपासून मी या योजनेत आहे. आरोग्य चांगले असल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते. बीएससी इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण करण्यापर्यंत आलेल्या प्रत्येक अडचणींमध्ये ट्रस्टने दिलेली साथ महत्त्वाची ठरली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button