
पुणे दि. 17 : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली असून राज्यात सर्वत्र गारठ्यात वाढ झाली आहे. थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला असून मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवडाभर थंडीची तीव्रता कायम राहणार आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाली असून पहाटे धुके आणि दव पडण्याची परिस्थिती आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोट्यांचा आसरा घेताना नागरिक दिसत आहेत.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निफाड आणि धुळे भागात पारा तब्बल ८ अंशांवर घसरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त करत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज विभागाने दिला आहे.