काँग्रेसचा ‘एकला चलो रे’ निर्णय; उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई दि. 16 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा देत स्वबळावर लढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या निर्णयाचा आदर असल्याचे स्पष्ट केले. “आमचा निर्णय आम्ही घेण्यास सक्षम आहोत, तसेच त्यांचा निर्णय ते घेण्यास सक्षम आहेत,” असे ठाकरे म्हणाले.

शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांनाही त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. “उंबरठा हा शब्द चुकीचा आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे,” असे म्हणत त्यांनी अफवांना विराम दिला.

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मालाडमधील शिबिरात केली होती. महाविकास आघाडीसोबत किंवा इतर कोणत्याही पक्षासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने जाहीर केला आहे.

शिवसेना-मनसे युतीच्या संभाव्य चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हिंदुत्व आणि मराठी मतांमध्ये होणारी घुसळण टाळण्यासाठी स्वबळाचा नारा दिल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी शिबिरात या निर्णयाची पुष्टी केली.

दरम्यान, बिहार निवडणूक निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. तो काय AI च्या माध्यमातून होता का? ज्यांच्या सभांना गर्दी होत नाही ते कसे जिंकले? बिहारचे गणित अनाकलनीय आहे,” अशा शब्दांत त्यांनी निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी महिलांच्या खात्यात जमा झालेल्या दहा हजार रुपयांचा घटक निकालावर निर्णायक ठरल्याचेही मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button