
पुणे, दि. 14 : पुणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागांतील २५ गुणवंत विद्यार्थ्यांची अमेरिकेतील १० दिवसांच्या शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत या दौऱ्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि जागतिक दृष्टीकोन विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, अमेरिकेतील नासा केनेडी स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी ही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आहे. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी, सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि शिक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. ‘‘अभ्यासदौऱ्याचा उपयोग देशासाठी बळकट पिढी निर्माण करण्यासाठी करा,’’ असे ते म्हणाले.
विद्यार्थी या दौऱ्यात नासा केनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, नासा अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर तसेच सॅन फ्रान्सिस्कोतील तंत्रज्ञान कंपन्यांना भेट देणार आहेत. शिष्टमंडळ १५ नोव्हेंबर रोजी पहाटे मुंबईहून रवाना होणार आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ६ वी व ७ वीतील ९ मुली आणि १६ मुलांचा समावेश असून त्यांच्या सोबत आयुकाचे शास्त्रज्ञ समीर दुर्डे, तसेच शिक्षक व आरोग्य अधिकारी सहभागी होत आहेत.हा उपक्रम ‘पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पा’अंतर्गत राबविण्यात येत असून १७,००० हून अधिक अर्जांमधून तीन टप्प्यांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आयुकाने विद्यार्थ्यांसाठी तयारी वर्ग तसेच शिक्षकांसाठीही प्रशिक्षणकार्यक्रम आयोजित केले.