जिल्हा परिषद पुणे आयोजित बालसाहित्य महोत्सव उत्साहात संपन्न; ३० शाळांतील ६०० विद्यार्थी ग्रंथ-दिंडीत सहभागी

पुणे, दि. १५ नोव्हेंबर : जिल्हा परिषद, पुणे आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय बालसाहित्य महोत्सव – २०२५ हा १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दिमाखात पार पडला. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपाचे संमेलन पार पडल्याने हा उपक्रम ऐतिहासिक ठरला.

महोत्सवाची सुरुवात ३० शाळांचे ६०० विद्यार्थी सहभागी झालेल्या भव्य ग्रंथ-दिंडीने झाली. ज्ञानेश्वरीतील विविध व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल-ताशा आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण रंगवले.

उद्घाटन समारंभाचे शुभारंभ विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तसेच संस्था अध्यक्ष राजन लाहे उपस्थित होते.

पहिल्या दिवशी “विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सकारात्मक वाचनपर्यावरण” या परिसंवादात श्री. चारुहास पंडित आणि सौ. संगीता बर्बे यांनी मार्गदर्शन केले. बाललेखकांना पद्मश्री माधुरी पुरंदरे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. बालकवी संमेलनात १५ बालकवींनी स्वतः रचलेल्या कविता सादर केल्या.

दुसऱ्या दिवशी कथा-कथन, वक्तृत्व सत्रात १५ विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. रवी मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने ‘टोटोचन’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले. अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी विद्यार्थ्यांचा प्रेरक संवाद झाला.

“लेखक आपल्या भेटीला” या सत्रात बालभारतीचे लेखक — एकनाथ आव्हाड, विलास सिंदगीकर, सुनंदा भावसार आणि मृणालिनी कानिटकर यांनी लेखन, कथानिर्मिती आणि चित्रांकनाविषयी मार्गदर्शन केले.प्रथमच आयोजित शिक्षक साहित्य संमेलनात शिक्षकांनी कविता, कथा-कथन आणि एकपात्री नाट्यप्रयोगातून आपली कला सादर केली.

समारोप सत्रात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एन. एम. जोशी, लक्ष्मीकांत देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष राऊत उपस्थित होते. ८ गटांतील २४ विद्यार्थी आणि २ गटांतील ६ शिक्षकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी सृजनशील, समावेशक आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण तयार करण्याची बांधिलकी व्यक्त केली.

बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात जिल्हा परिषद शाळांतील १,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या साहित्यकृतींचे भव्य प्रदर्शन पाहायला मिळाले.
त्याचबरोबर LFE, रूम टू रीड, OLF, FLOA, थिंकशार्प फाऊंडेशन आणि प्रथम बुक्स यांनी साक्षरतेवरील उपक्रम व यशोगाथा प्रदर्शित केल्या.

मेहता पब्लिशिंग हाऊस, ज्योत्स्ना प्रकाशन, साधना प्रकाशन, बालभारती, न्यानगंगा आणि ज्ञानप्रबोधिनी प्रकाशन यांनी मुलांसाठी समृद्ध साहित्यसंग्रह सादर केला.दोन दिवसीय हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, साहित्य, सृजनशीलता आणि प्रेरणेचा उत्सव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button