नवलेपुल अपघातानंतर कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याचे केंद्राचा आदेश — मुरलीधर मोहोळ

पुणे, दि. 15 : नवलेपुल परिसरात झालेल्या दुर्दवी अपघातानंतर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबवाव्यात, तसेच विभागनिहाय जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना केंद्रीय नागरी व वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस आमदार भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, PMC आयुक्त नवकिशोर राम, PMRDA आयुक्त डॉ. योगेश म्हसे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोहोळ यांनी सांगितले की PMRDA मार्फत जांभूळवाडी ते वारजे रिंगरोडच्या डीपीआरला गती देण्यात येणार असून उन्नत कॅरिडॉरचा डीपीआर लवकरच मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवला जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जांभूळवाडी–रावेतदरम्यान सेवा रस्ता आणि अंडरपासची कामे तातडीने पूर्ण करावी तसेच भूसंपादन प्रक्रियेलाही वेग द्यावा, असे निर्देश देण्यात आले.

महामार्गावरील स्पीड गनची संख्या सध्या 3 असून ती वाढवून 6 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनांची वेगमर्यादा 60 किमी ऐवजी 30 किमी प्रतितास करण्यात येणार आहे. खेड शिवापूर टोलनाक्यावर अवजड वाहनांची अतिभार, ब्रेक तपासणी व तांत्रिक तपासणी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर पुढील टोलनाक्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

रस्त्यांवरील रिफ्लेक्टर वाढविणे, पीएमपीएमएलने अधिकृत बसथांबे निश्चित करणे, सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी PMC व PCMC यांनी संयुक्तपणे मोहीम राबवण्यावरही भर देण्यात आला.डिसेंबरमध्ये या सर्व सूचनांची अंमलबजावणी आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button