माई समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’; ‘माई दिनदर्शिका – 2026’ चे पुण्यात प्रकाशन

पुणे : पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या वाढदिवस आणि बालदिनाच्या औचित्याने ‘सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, मांजरी’ तर्फे ‘माई दिनदर्शिका – 2026’ चे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख व अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी माईंच्या कार्याचा गौरव करताना त्यांना समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’ असे संबोधले.

कृष्ण प्रकाश म्हणाले, “माईंना प्रथम नांदेडमध्ये भेटलो आणि त्यांच्या शब्दांनी मला खोलवर प्रेरित केले. आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगांमध्येही त्यांनी कधीही नकारात्मकता स्वीकारली नाही. अर्जुनाप्रमाणे ध्येयावर लक्ष केंद्रीत ठेवून त्यांनी स्वतःचे दुःख विसरून हजारो आयुष्ये प्रकाशमान केली.”

ते पुढे म्हणाले की, माईंकडे कोणतेही पद किंवा सत्ता नव्हती, तरीही समाजासाठी त्यांनी केलेली सेवा आदर्श राजासारखी होती. “एका दिव्याने दुसरा दिवा पेटवावा तसे माईंनी हजारो जिवनांना उजेड दिला,” असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी मनिष कासोदेकर (लेटर्स अँड स्पिरिट आर्ट क्लब) यांनी दिनदर्शिकेच्या निर्मितीचा अनुभव सांगताना म्हटले की, “माईंचा विशाल प्रवास फक्त १२ पानांत मांडणे मोठे आव्हान होते. आम्ही केवळ फोटो नाही तर त्यांच्या विचारांचा अर्थपूर्ण अनुभव देण्याचा प्रयत्न केला.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, “माईंनी जे भोगले ते त्यांच्या नशिबात होते; पण असे प्रसंग कुणालाही यायला नकोत म्हणून त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या संस्था हेच त्यांचे जिवंत अस्तित्व आहे.” बालदिन आणि माईंचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने हा योग विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.

‘माई पब्लिकेशन’ तर्फे प्रकाशित या दिनदर्शिकेच्या विक्रीतून येणारा संपूर्ण नफा माईंच्या संस्थांतील मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा भडांगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button