
पुणे : संविधान दिनानिमित्त विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ या एकदिवसीय महाकाव्य संमेलनाचे आयोजन २५ नोव्हेंबर रोजी एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले आहे.
या संमेलनात ‘क्रांतिसूर्य सावित्रीज्योति पुरस्कार’ मंदाकिनी व बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील कन्या महाविद्यालयाला ‘ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ज्ञानसाधना पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.
संविधान दिनानिमित्त ‘संविधान सन्मान आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ही विविध माध्यम संस्थांतील महिला पत्रकारांना प्रदान केले जातील. सकाळी डॉ. सविता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल, तर दुपारी प्रिया माळी यांच्या अध्यक्षतेखाली ‘सावित्रीची काव्यफुले’ काव्यसंमेलन होणार आहे. तीसहून अधिक कवयित्री सहभागी होणार असून इतर साहित्यिक पुरस्कारांचेही वितरण होणार आहे. संमेलनासाठी प्रशांत रोकडे परिश्रम घेत आहेत.