
पुणे : प्रतिनिधी
“व्यवसाय करताना समाजाकडून आपण खूप काही मिळवतो. त्यामुळे समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला काहीतरी परत देणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन तापडिया लाइफ सायन्सेसचे संचालक सुशील बियानी यांनी केले.
तापडिया लाइफ सायन्सेसच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन वास्तूचे लोकार्पण ब्रिजलाल बियानी आणि उषा बियानी यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी ओमप्रकाश तापडिया, जुगल किशोर तापडिया, अनुप तापडिया, डॉ. विशाल तापडिया, सुनील शहा, प्रशांत अग्रवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बियानी यांनी सांगितले, “अत्यावश्यक व दुर्मिळ औषधांचा वेळेवर आणि जबाबदारीने पुरवठा व्हावा यासाठी 2008 मध्ये तापडिया लाइफ सायन्सेसची स्थापना झाली. कर्करोग, आयसीयू, क्रिटिकल केअर, प्रतिरक्षा विज्ञान, वृक्करोग, नेत्ररोग, रक्तरोग, प्लाझ्मा उत्पादने, एचव्ही उपचार, संधिवात विज्ञान अशा गंभीर आजारांसाठी लागणारी जीवनावश्यक औषधे आम्ही पुरवतो. यामध्ये 100 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंतच्या इंजेक्शन्स व औषधांचा समावेश आहे.”
सध्या कंपनीकडून राज्यातील 500 पेक्षा अधिक रुग्णालयांना औषधांचा पुरवठा केला जातो. एकूण पुरवठ्यातील 70% औषधे थेट रुग्णालयांना, तर उर्वरित वितरक आणि मोठ्या औषध दुकाने यांना दिली जातात.
देशातील अग्रगण्य तसेच नामांकित बहुराष्ट्रीय अशा 55 औषध उत्पादक कंपन्यांची दुर्मिळ औषधे तापडिया लाइफ सायन्सेस वितरित करते. त्यापैकी काही विशेष औषधांचे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील वितरणाचे हक्क कंपनीकडे असल्याचेही बियानी यांनी स्पष्ट केले.
“आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन आणि योग्यवेळी रुग्णापर्यंत औषध पोहोचवण्याची अचूक प्रणाली हे आमचे प्रमुख वैशिष्ट्य आहे,” असेही त्यांनी सांगितले. औषधांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी योग्य तापमान नियंत्रण, शिस्तबद्ध साठवण आणि कमी मानवी हाताळणी यावर कंपनीचा विशेष भर आहे.
पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे कंपनीच्या शाखा कार्यरत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात जाळे असून लवकरच देशव्यापी विस्तार करण्याचा निर्धार असल्याचेही बियानी यांनी नमूद केले.