
मुंबई दि. 15 : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं अखेर ‘एकला चलो रे’चा नारा देत स्वबळावर लढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी अधिकृत घोषणा केली. “227 सर्व प्रभागांवर काँग्रेस उमेदवार उभे करणार आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे आणि तिचाच आदर करून आम्ही हा निर्णय घेतला,” असे ते म्हणाले. पक्षात कोणतीही नाराजी नसून सर्व कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनीही स्वबळावर लढण्याची मागणी शिबिरात मांडल्याचे सांगितले. “मुंबई काँग्रेसची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याशी आमची युती कायम आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चाही करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे महाविकास आघाडीत पहिला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. नुकताच पार पडलेल्या बिहार निवडणुकीच्या निकालाचा काँग्रेसवर मानसिक परिणाम झाला का? हा ‘बिहार इफेक्ट’ मुंबईत दिसतोय का? अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुंबईतील राजकीय समीकरणं बदलत असतानाच काँग्रेसच्या या घोषणेमुळे निवडणुकीचा माहोल आणखी तापण्याची चिन्हे आहेत.