
पुणे दि. 15 : आयपीएल 2025 च्या सीजनपूर्वी ट्रेडिंग प्रक्रियेला वेग आला असून काही मोठ्या खेळाडूंची अदलाबदल निश्चित झाली आहे. रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन यांच्यासह अर्जुन तेंडुलकरच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात अर्जुन तेंडुलकरच्या ट्रान्सफरची डील पक्की झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
अर्जुनच्या बदल्यात शार्दुल ठाकूर मुंबईकडे, तर अर्जुन लखनऊकडे जाण्याची चर्चा काही दिवसांपासून होती. शार्दुलबाबतची अधिकृत माहिती आधीच समोर आली होती, मात्र अर्जुनबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा नव्हती. आता मात्र दोन्ही संघांदरम्यान झालेल्या चर्चेत ही ट्रान्सफर पूर्ण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अर्जुन तेंडुलकर मागील पाच हंगामांपासून मुंबई इंडियन्सच्या स्क्वॉडचा भाग आहे. 2021 मध्ये प्रथमच तो संघात दाखल झाला. दोन हंगाम बेंचवर राहिल्यानंतर 2023 मध्ये त्याला नियमित खेळण्याची संधी मिळाली. चार सामन्यांत 3 विकेट्स आणि 13 धावा अशी त्याची कामगिरी होती. 2024 मध्ये त्याला फक्त एकच सामना मिळाला.
डावखुरा वेगवान गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून त्याला ओळखले जाते. 2025 च्या मेगा ऑक्शनआधी मुंबईने त्याला रिलीज केले होते; मात्र नंतर पुन्हा 30 लाखांच्या बेस प्राईसमध्ये त्याला घेतले. सध्या तो गोव्याकडून रणजी ट्रॉफीत खेळत असून गोलंदाजीत आणि फलंदाजीत प्रभावी कामगिरी करत आहे.