एकल, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी ‘माझी लाडकी बहीण’ ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा; १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत

पुणे दि. १५ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांनी १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असून आता केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, एकल महिला तसेच पती वा वडिलांचे निधन झालेले किंवा घटस्फोटित महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत अडचणी येत असल्याची बाब नोंद घेत महिला व बालविकास विभागाने तांत्रिक बदलांची प्रक्रिया सुरू केली आहे.

या महिलांची आवश्यक माहिती अपलोड करता न येण्याबाबत अनेक तक्रारी मिळाल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी या वर्गातील महिलांसाठी प्रणालीमध्ये सुधारणा केली जात असल्याचे स्पष्ट केले.“ज्या महिलांच्या पतींचे अथवा वडिलांचे निधन झाले आहे त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, तसेच घटस्फोटित महिलांचे घटस्फोटाचे दस्तऐवज अपलोड करण्याची सोय वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे,” असे तटकरे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिला कोणत्याही परिस्थितीत वंचित राहू नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेकांनी आपली कागदपत्रे गमावली आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन मुदतवाढ आणि इतर निर्णय सकारात्मकपणे घेतले जातील.”सरकारचा उद्देश स्पष्ट करताना तटकरे म्हणाल्या की, “एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेत आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button