देश-समाजसेवेसाठी जात, प्रांत,भाषेच्या पलीकडे जा; सुनील देवधर यांचे प्रतिपादन

पुणे : “समाजसेवेसाठी जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या चौकटीत अडकून न पडता कार्य केले पाहिजे. महाराष्ट्रात येऊन वंचित, अनाथ मुलांसाठी कार्य उभारणारे अमितकुमार बॅनर्जी हे त्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे,” असे प्रतिपादन भाजपचे माजी सचिव आणि माय होम इंडिया संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांनी केले.

अमितकुमार बॅनर्जी यांच्या जीवन आणि सामाजिक कार्यावर आधारित ‘संघर्षगाथा माझ्या आयुष्याची’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन पत्रकार भवन येथे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे, माजी शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉ. अनिल गुंजाळ, साहित्यिक प्रसाद मिरासदार, सु. वा. जोशी, रत्ना बॅनर्जी, सुधीर राशिनकर, अण्णा कातळे आदी मान्यवर उपस्थित होते.

देवधर म्हणाले, “संपर्क संस्थेच्या बालग्राम उपक्रमाचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत. अनाथ आणि निराधार मुलांसाठी त्यांनी उभारलेले कार्य देवासमान आहे. आपल्याला समाजाकडून खूप काही मिळते, त्याची परतफेड निरपेक्ष सेवाभावातून करणे म्हणजे खरा धर्म. या सेवाकार्यात भ्रष्टाचार किंवा व्यावसायिकता येऊ नये, ही जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.”

आपल्या भावनिक प्रवासाचे वर्णन करताना अमितकुमार बॅनर्जी म्हणाले, “सुमारे ३५ वर्षांपूर्वी फक्त सात अनाथ मुलांसह मातीच्या घरातून या संस्थेची सुरुवात केली. आज देशभरात ११ केंद्रे उभी आहेत. केवळ भावना नव्हे, तर योग्य नियोजन, गणित आणि सातत्याने हे कार्य वाढवले. माझ्या सोबत उभे राहिलेल्या सर्वांचे हे काम आहे. हे पुस्तक माझे आंदोलन नसून माझ्या प्रवासाचा साधा आलेख आहे.”डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “दुसऱ्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात संघर्ष करून एवढे मोठे कार्य उभारणे हे राष्ट्रीय एकात्मतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. या पुस्तकामुळे अनेकांना सामाजिक कार्यासाठी नवी प्रेरणा मिळेल.”

कार्यक्रमात डॉ. अनिल गुंजाळ, प्रसाद मिरासदार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले, तर चेतन देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या कार्यात दीर्घकाळ योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन सीईओ अनुज सिंग व परेश खाडिलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button