
पाटणा, दि. 14 : बिहार निवडणूक निकालांनंतर राजकीय वातावरण तापले — सत्ता कुणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.गणनेतील कलांमध्ये भाजपने बहुमताचा टप्पा पार करत अग्रस्थान मिळवले असून, निकाल स्पष्ट होताच एनडीएच्या शिविरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
भाजप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने पक्ष कार्यालयांमध्ये उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच इतर नेतेही दिल्लीतील आणि मुंबईतील पक्ष कार्यालयात विजयाचा आनंद व्यक्त करताना दिसले.
महाआघाडीचा ‘सुपडा साफ’
या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाआघाडी ५० जागांच्या आत थांबली असून, बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. जनता दल (युनायटेड) दुसऱ्या क्रमांकावर पोहोचत एनडीएची ताकद आणखी वाढली आहे.निवडणुकीतील या निकालांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांतील धक्कादायक बदलांची पुनरावृत्तीच केल्याचं राजकीय विश्लेषकांकडून म्हटलं जात आहे. बिहारमध्येही मतदारांनी स्पष्ट बहुमत देत सत्ता एनडीएकडे झुकवली आहे.