
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री श्रेया जाधव यांची प्रमुख भूमिका असलेलं भावपूर्ण प्रेमगीत “तुला ना कळे” नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली म्हणून हे गीत साकारण्यात आले आहे.भारताच्या हवाई अपघात इतिहासातील सर्वात भीषण ठरलेल्या अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यांच्याच वेदना, अधुरी स्वप्नं आणि हरवलेलं प्रेम या गाण्यातून मांडण्यात आलं आहे.
हे गीत सुप्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका शुद्धी कदम यांच्या आवाजात साकारले आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन अभिनंदन गायकवाड (A.V.G.) यांचे असून संगीत संयोजन मिलिंद मोरे यांनी केले आहे.
गाण्याचे दिग्दर्शन सागर सकट यांनी केले असून निर्मिती वैशाली काळे, सागर सकट आणि नितीन घुगे यांनी केली आहे. याशिवाय प्रज्ञा कदम, प्रथमेश कदम, वैशाली जाधव, आशुतोष कांबळे, किरण राऊत, केतन रणखांबे, प्राजक्ता मोहिते आणि विजय सोनगिरे यांनीही अभिनय केला आहे. हे गीत मुंबईतील मरीन लाइन्स, गिरगाव, फोर्ट आणि ठाणे परिसरात चित्रीत करण्यात आले आहे.
गीताची निर्मिती आणि संकल्पना
संगीत दिग्दर्शक अभिनंदन गायकवाड सांगतात,
“विक्रोळी ते ठाणे प्रवासादरम्यान सागरने सांगितलेल्या एका कथेतून या गाण्याचं शीर्षक सुचलं. बोलता बोलता मुखडाही सुचला आणि गाणं तयार झालं.”
निर्माती वैशाली काळे म्हणतात,
“‘तुला ना कळे’ हा एक सुंदर प्रवास आहे… अहमदाबाद दुर्घटनेतील एका एअर होस्टेसची अधुरी प्रेमकहाणी आम्ही या गाण्यात मांडली.”
एस एन वी स्टुडिओ या संगीत लेबलचं हे पहिलं गीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दिग्दर्शक सागर सकट म्हणतात,
“अहमदाबाद दुर्घटनेत अनेक जणांनी प्रियजन गमावले. त्या सर्वांना समर्पित असं ३ मिनिटांचं प्रभावी गाणं करावं, अशी कल्पना मनात आली आणि हे गीत साकारलं.”
चित्रीकरणातील किस्सा
अजिंक्य राऊत सांगतो,
“गिरगावच्या १०० वर्ष जुन्या चाळीत दोन दिवसांत हे शूट पूर्ण केलं. स्पर्श न करता नजरेतून फुलणारं प्रेम आम्ही दाखवलं आहे. दिवाळीत शूटदरम्यान चाळीतल्या घरी लाडू बनवतानाही खूप मजा आली.”या गाण्याचं संगीत अनावरणही मुंबईत उत्साहात पार पडलं.
