
पुणे दि. 14 : पुण्यात कात्रजच्या बोगद्याजवळ मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने आठ ते दहा वाहनांना धडक बसली. नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने एका कारला जोरदार धडक देत ती बराच अंतर फरफटत नेली आणि पुढील ट्रकवर जाऊन आदळला. दोन ट्रकांच्या मधोमध अडकल्याने कार पूर्णपणे चिरडली गेली आणि काही क्षणांतच स्फोटासह पेट घेऊन जळून खाक झाली.
या भीषण अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून सोळा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर दरी पूल–नवले पुल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तीनही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने कारमध्ये लागलेली आग आटोक्यात आणली आहे. तथापि कार अद्याप दोन्ही ट्रकांच्या मध्येच अडकलेली असून ती बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा नवले पुल परिसरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.