
पुणे दि. 14 : मराठी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) नुकतीच सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड झाली आहे. निळ्या रंगाची साडी आणि स्लीवलेस ब्लाउजमधील तिचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या लूकची दखल घेत तिला भरभरून कौतुक दिलं. इतकंच नाही तर काहींनी तिची तुलना थेट अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इटालियन मॉडेल मोनिका बेलुची यांच्याशी केली आहे.अलीकडेच एका हिंदी युट्यूब चॅनलला दिलेल्या इंटरव्यूतील गिरीजाच्या सहज, आत्मविश्वासपूर्ण अंदाजामुळेही ती चर्चेत राहिली. या इंटरव्यूची क्लिप व्हायरल होताच सोशल मीडियावर तिच्याबद्दल नवीन ट्रेंड सुरू झाला.
मॉर्फ फोटोबद्दल गिरीजा ओकची स्पष्ट भूमिका
या अचानक झालेल्या ट्रेंड आणि तिच्या मॉर्फ केलेल्या फोटोंवर गिरीजाने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली:”हा जे काही ‘खेळ’ आहे, त्याचे कोणतेही नियम नाहीत आणि यात काहीही ‘अनुचित’ नाही, हीच गोष्ट मला घाबरवते.”गिरीजाने सांगितलं की तिचा १२ वर्षांचा मुलगा सध्या सोशल मीडिया वापरत नसला तरी मोठा झाल्यावर हे फोटो त्याच्या नजरेस पडू शकतात.”उद्या माझा मुलगा मोठा झाल्यावर असा फोटो पाहिला, तर त्याला काय वाटेल, याचा विचार करून मला बरं वाटत नाही. त्याला ठाऊक असेल की हा AI वापरून तयार केलेला आहे, तरीही एक प्रकारची मजा लोक घेत असल्याचं दिसतं,” असं तिने म्हटलं.
व्हायरल झाल्याचा आनंदही व्यक्त
या सर्व घडामोडींमुळे अनेक नवीन लोक तिच्या कामाशी परिचित होत आहेत, याचा आनंदही गिरीजाने व्यक्त केला.
ती म्हणाली:”या निमित्ताने माझी चित्रपटं आणि नाटकं बघितली गेली, तर यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही.”गिरीजाने चाहत्यांचे आभार मानत, “आपण सिनेमागृहात आणि नाट्यगृहात भेटू,” असे सांगत व्हिडिओचा समारोप केला.