
पुणे : त्रिभाषा धोरण समितीसमोर आमदार बापू पठारे आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडलेल्या ‘हिंदी पहिलीपासून सक्तीची करावी’ या भूमिकेवर आम आदमी पार्टीने जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.वडगाव शेरी मतदारसंघात उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्याचे कारण देत पठारे यांनी त्यांच्या सोयीसाठी हिंदी भाषा सुरुवातीपासूनच सक्तीची करावी, अशी मागणी केली. या भूमिकेला आम आदमी पार्टीने “बोटचेपी आणि मराठीविरोधी” म्हणत विरोध दर्शवला.
“महाराष्ट्रात रोजगार, व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी आलेल्या नागरिकांनी मराठीचा अवलंब करणे आवश्यक आहे. उलट मराठीवर हिंदीचे वर्चस्व लादण्याचा हा प्रयत्न आहे,” अशी टीका AAP चे मुकुंद किर्दत यांनी केली.दरम्यान, पुण्यातील कोथरूडमधून निवडून आलेल्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही हिंदी पहिलीपासून सक्ती करण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. मुलांवर आणि पालकांवर अनावश्यक शैक्षणिक ओझे टाकणारा हा निर्णय असल्याचे आपने म्हटले.
“तिसरी किंवा चौथी भाषा आवडीने शिकणे वेगळे; पण सक्ती करणे म्हणजे सांस्कृतिक सपाटीकरणाचा प्रयत्न. हिंदी संस्कृतीचा बालवयातील मारा हा मायबोली मराठीला घातक ठरेल,” अशी कडवट प्रतिक्रिया पार्टीने व्यक्त केली.डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिभाषा धोरण समितीसमोर हिंदी भाषेची अप्रत्यक्ष सक्ती असलेल्या प्रस्तावाला आम आदमी पार्टीने स्पष्ट विरोध नोंदवला.