
पुणे दि 14: पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) राखीव जागांवर केवळ खऱ्या ओबीसी समाजातील उमेदवारांनाच संधी देण्यात यावी, अशी ठाम मागणी ओबीसी बहुजन महासंघाने केली आहे. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवार दिल्यास सर्वच जागांवर उमेदवार उभे करून संघर्ष छेडण्याचा इशारा महासंघाचे बाळासाहेब झोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत झोरे यांच्यासोबत भानुदास पानसरे, किसन नांगरे, चंदाताई केदारी, आनंद रोकडे, राजेंद्रभाऊ नांगरे, विशाल शेळके, महादेव मरगळे, भाऊसाहेब मरगळे, अशोक कांबळे, भाऊसाहेब आखाडे, कृष्णा पानसरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या ९ जागांपैकी ओबीसींसाठी ३ तर अनुसूचित जातीसाठी १ जागा आरक्षित आहे. या जागांवर केवळ खऱ्या ओबीसी समाजातील उमेदवारांनाच तिकीट द्यावे, अशी आग्रही भूमिका महासंघाने सर्वच राजकीय पक्षांसमोर व्यक्त केली.
झोरे म्हणाले, “ओबीसींच्या हक्काच्या जागांवर कुणबी प्रमाणपत्रावर आधारित उमेदवार उभे केल्यास आम्ही केवळ आरक्षितच नव्हे तर सर्व ९ जागांवर उमेदवार देऊ. हा प्रश्न निवडणुकीच्या विजय-पराजयाचा नाही, तर ओबीसी बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा आहे. पुढे ग्रामपंचायतींपासून गावगाड्यातून आमचे अस्तित्व पुसण्याचा हा प्रयत्न आहे.”
२० नोव्हेंबर रोजी महामेळावा
ओबीसी बहुजन समाजाची एकजूट दाखवण्यासाठी आणि आपली भूमिका सर्व पक्षांपर्यंत ठामपणे पोहोचवण्यासाठी गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी मुळशी तालुका ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे तसेच रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.