मुदतपूर्व नवजात अर्भकांना मिळाले ‘सेकंड होम’

रोटरी क्लबतर्फे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोन निओनेटल इनक्युबेटरची देणगी

पुणे : मुदतपूर्व (प्रिमॅच्युअर्ड) जन्मलेल्या अर्भकांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अत्याधुनिक इनक्युबेटरच्या स्वरूपात ‘सेकंड होम’ उपलब्ध झाले आहे. रोटरी क्लब ऑफ सॅन रॅमेन व्हॅली, रोटरी क्लब ऑफ मोरागा (अमेरिका) आणि रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने दोन निओनेटल इनक्युबेटर रुग्णालयातील नवजात अर्भक अतिदक्षता विभागाला (एनआयसीयू) देणगी स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले.

गर्भाशय हे अर्भकाचे पहिले घर मानले जाते. मात्र काहीवेळा बाळांचा जन्म मुदतपूर्व होतो आणि त्यांना आईच्या गर्भाइतके सुरक्षित वातावरण देणे आवश्यक असते. या गरजेतून ‘रोटरी क्लब’ने पुढाकार घेत रुग्णालयाला अत्याधुनिक इनक्युबेटर उपलब्ध करून दिले आहेत.

हा उपक्रम नवजात बालक सप्ताह आणि जागतिक मुदतपूर्व जन्म दिन या निमित्ताने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पद्मविभूषण डॉ. विजय केळकर, रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीचे अध्यक्ष कौस्तुभ भांडारकर, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुलकर्णी, माजी अध्यक्ष वृषाली खिरे, हेमंत खिरे, रमेश भागवत, डॉ. मोहन परांजपे, सुरेश इंगळे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, तसेच बालरोग विभाग प्रमुख डॉ. राजन जोशी उपस्थित होते. अमेरिकेतून अर्चना आणि प्रदीप सुदामे यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. विमलाबाई सुपनेकर यांच्या स्मरणार्थ ही इनक्युबेटर देणगी देण्यात आली.

रोटरी क्लबच्या वृषाली खिरे म्हणाल्या, “मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांना जीवनदान देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. डॉक्टरांचे कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा संगम होऊन अनेक अर्भकांचे प्राण वाचू शकतील.”

डॉ. धनंजय केळकर म्हणाले, “करूणा आणि तंत्रज्ञानाची जोड म्हणजे हा उपक्रम. नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी रोटरीकडून मिळालेली ही साथ वाखाणण्याजोगी आहे.”

डॉ. राजन जोशी यांनी सांगितले की, “या नव्या इनक्युबेटरमुळे रुग्णालयातील एनआयसीयू सेवा अधिक प्रगत आणि सुरक्षित बनली आहे. मुदतपूर्व बाळांसाठी हे इनक्युबेटर त्यांच्या आयुष्याचे पहिले तीन महिने म्हणजेच त्यांचे दुसरे घर ठरणार आहेत.”

🔹 इनक्युबेटरची वैशिष्ट्ये

गर्भाशयासारखे सुरक्षित आणि नियंत्रित वातावरण

बाहेरील आवाज व प्रकाशापासून संपूर्ण संरक्षण

मानवी स्पर्शाशिवाय देखभाल सुलभ

पोषक द्रव्यांचे अचूक निरीक्षण व नोंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button