
पुणे, दि. 12 : पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये भीतीचं सावट इतकं पसरलं आहे की, पालक आपल्या मुलामुलींसाठीची सोयरीक नाकारू लागले आहेत. ‘वेल सेटल’ असलेल्या मुलांचीही लग्ने रखडत असून सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिक सतत भीतीच्या छायेत जगत आहेत. ग्रामस्थांच्या मते, बिबट्याचे दर्शन आता केवळ एका मळ्यात मर्यादित नसून, प्रत्येक गावात किमान तीन ते चार मळ्यांमध्ये बिबटे आढळत आहेत. शेतकरी आणि कामगार वर्ग आता रात्रीच्या वेळी शेतीकडे जाणं टाळत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. अलीकडेच पिंपरखेड गावात १४ वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत — काही ठिकाणी लोखंडी कुंपण, सौर दिवे आणि सामुदायिक गस्त सुरू करण्यात आली आहे.
या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, वन विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि मानवी जीविताचे रक्षण करण्यासाठी वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.दरम्यान, प्रशासन आणि वन विभागानेही या भागातील बिबट्यांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्याचे आणि पथक वाढविण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळते. मात्र, ग्रामस्थांच्या मते, हे उपाय अपुरे ठरत असून, भीतीमुळे गावांमधील सामाजिक जीवन ठप्प झालं आहे.