
पुणे, दि. १२ : लग्नाचा हंगाम सुरू झाला की प्री-वेडिंग फोटोशूटचं वेड चढतं. अनोख्या ठिकाणी, खास थीमवर फोटो काढण्यासाठी अनेक जोडपी उत्सुक असतात. पण या उत्साहात नियमांचं उल्लंघन केल्यास त्रास होऊ शकतो, याचं उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं आहे.शहरातील एका जोडप्याने पुणे मेट्रोच्या विविध स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये परवानगीशिवाय प्री-वेडिंग फोटोशूट केलं. मेट्रो प्रशासनाने अशा शूटसाठी स्पष्ट मनाई केलेली असूनही फोटोग्राफर आणि जोडपं नियमांचं उल्लंघन करत शूट करत होते. स्टेशनवर “फोटोशूट करू नये” अशी उद्घोषणा होत असतानाही त्यांनी शूट सुरूच ठेवलं . या प्रकाराची माहिती मिळताच पुणे मेट्रो प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित जोडपं आणि फोटोग्राफरवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, दंडाची नेमकी रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मेट्रो प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, “मेट्रो परिसरात किंवा ट्रेनमध्ये कोणतेही व्यावसायिक शूट किंवा फोटोग्राफी करायची असल्यास पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. नियमभंग झाल्यास कारवाई होईल.”लग्नाच्या तयारीत वेगळेपणा दाखवण्याच्या नादात हे जोडपं सोशल मीडियावर नक्कीच चर्चेत आलं असलं, तरी आता त्यांच्या या ‘क्रिएटिव्ह’ आयडियाची किंमत त्यांना दंडाच्या स्वरूपात मोजावी लागली आहे.