
समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या आणि संघर्षमय कथांना प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षावर आधारित ‘ऊत’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मोठ्या दिमाखात लाँच करण्यात आला.वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित या चित्रपटात संघर्षासोबत एक हळवी प्रेमकथा देखील पाहायला मिळणार आहे. “हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावेल,” असा विश्वास निर्माता-अभिनेता राज मिसाळ यांनी व्यक्त केला.
चित्रपटाचा नायक शरणम हा कर्तव्य आणि प्रेम यांच्या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा संघर्ष, भूतकाळातील वेदना आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द — ही कहाणी प्रेक्षकांना प्रेरणा देणारी आहे.“स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत आणि ती पूर्ण करायला लागते ती फक्त मेहनत आणि जिद्द,” हा चित्रपटाचा भावनिक संदेश आहे. शरणमचं ध्येय पूर्ण होतं का? प्रेमाची साथ लाभते का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रेक्षकांना २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात ‘ऊत’ पाहावा लागेल.
चित्रपटात राज मिसाळ, आर्या सावे, सुपर्णा श्याम, राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरुषोत्तम वाघ, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदही ठाकूर आदी कलाकार झळकणार आहेत.
तांत्रिक बाजू:
छायांकन: करण तांदळे
संकलन: सुनिल जाधव
वेशभूषा: वैशाली काळे
रंगभूषा: अमर राठोड
कलादिग्दर्शन: निलेश गरुड
नृत्यदिग्दर्शन: जीत सिंह
चित्रपटातील गीतकार वैभव देशमुख, वैभव जोशी, डॉ. विनायक पवार, सुबोध पवार, दिपक वाघ, तर गायक म्हणून अजय गोगावले, हरिहरन, आदर्श शिंदे, जयदीप वैद्य, योगेश गायकवाड यांच्या आवाजाचा जादुई स्पर्श लाभला आहे. संगीत दिग्दर्शन विजय गवंडे, श्रेयस आंगणे, आशुतोष कुलकर्णी, अरविंद सांगोळे, शारंग जैसवाल यांनी केले आहे.