लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; परिसरात खळबळ, अनेक जखमी

वी दिल्ली, दि. 11 : राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ भीषण स्फोट झाला. एका कारमध्ये झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागली. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्फोटानंतर काही क्षणांतच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. स्फोट झालेलं ठिकाण लाल किल्ल्यापासून अवघं 800 मीटर अंतरावर असल्याने सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. या घटनेकडे संशयाच्या नजरेतून पाहण्यात येत असून पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तपासात गुंतल्या आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू आला. स्फोटानंतर परिसरात धूर पसरला आणि काही वेळातच एकच गोंधळ उडाला.

प्राथमिक तपासात समोर आलं आहे की ही कार स्फोटाच्या सुमारे तीन तास आधीपासून त्या ठिकाणी उभी होती. पोलिसांना कारचालकाचा एक संशयास्पद फोटोही मिळाला असून त्याच्यावर चौकशी सुरू आहे.दरम्यान, यापूर्वीही राजधानी दिल्लीत अशा प्रकारचे स्फोट घडले आहेत. त्यामुळे या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणांनी लाल किल्ला आणि आसपासचा परिसर सील करून तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button