
मुंबई : बॉलिवूडमधील बड्या प्रोजेक्ट्सचा भाग बनलेला अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या नव्या वेब सीरिज ‘डिटेक्टिव धनंजय’मुळे चर्चेत आहे. कोठारे व्हिजनच्या ‘नशीबवान’ मालिकेनंतर आता तो नव्या वेब प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावरून या वेब सीरिजची घोषणा करत चाहत्यांना खास गिफ्ट दिलं होतं.झी 5 मराठी ओरिजनल अंतर्गत तयार होणाऱ्या या वेब सीरिजमध्ये आदिनाथ ‘डिटेक्टिव धनंजय’च्या भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजमध्ये तो अभिनेता आणि निर्माता अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
मुंबईत नुकताच या वेब सीरिजचा भव्य मुहूर्त पार पडला असून शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे. ही वेब सीरिज लवकरच झी 5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.डिटेक्टिव धनंजय’ची निर्मिती मराठी इंडस्ट्रीतील दोन मोठ्या निर्मिती संस्थांनी — श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड — मिळून केली आहे. गिरीश जोशी यांनी स्क्रीनप्ले लिहिला असून श्रीरंग गोडबोले दिग्दर्शन करत आहेत.
या नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला,“प्रेक्षकांसाठी कायम वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘डिटेक्टिव धनंजय’मधून आम्ही काहीतरी खास घेऊन येणार आहोत. कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेबशोमधून उलगडणार आहे, आणि मला या भूमिकेची फार उत्सुकता आहे.अभिनेता, निर्माता आणि आता ओटीटी विश्वात दमदार पाऊल टाकणारा आदिनाथ कोठारे लवकरच ‘रामायण’ आणि ‘गांधी’सारख्या बड्या हिंदी प्रोजेक्ट्सचाही भाग होणार आहे.
