
पुणे दि. 10 नोव्हेंबर : “हिंदू आणि मराठी माणसाला जिवंत ठेवणाऱ्या काही मोजक्या संघटनांपैकी पतित पावन संघटनेचे मोठे योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी झाला. त्यामुळे शिवसेना आणि पतित पावन हे भगव्या रंगाचे दोन मजबूत प्रवाह आज एकत्र आले आहेत. हिंदुत्वाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कर्वेनगर येथे पतित पावन संघटनेतर्फे आयोजित ‘युती हिंदुत्वाची कार्यकर्ता मेळावा’ उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा शुभारंभ झाला.या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
🔸 हिंदुत्व म्हणजे जीवन पद्धतीचे सार – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्माऐवजी ‘हिंदुत्व’ हा शब्द वापरला. हिंदुत्व म्हणजे हिंदू जीवन पद्धतीचे सार आहे. जो हिंदुत्व विसरतो तो स्वत्व विसरतो, आणि जो स्वत्व विसरतो तो अस्तित्व विसरतो. त्यामुळे आपली विचारधारा जपली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे.”ते पुढे म्हणाले, “पतित पावन संघटना गेली अनेक वर्षे सावरकरांच्या विचारांचा प्रसार करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हिंदुत्वाची बुलंद हाक दिली. जेव्हा हिंदुत्वावर आघात झाला तेव्हा सडेतोड उत्तर देण्याचे काम शिवसेना आणि पतित पावन संघटनेने केले.”
लाडकी बहिण योजना सुरूच राहणार
शिंदे म्हणाले, “लाडकी बहिण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे आणि ती बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो. आमचं काम बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरून आहे. काही जण खुर्चीसाठी रंग बदलतात, पण आम्ही तसं करत नाही.”
पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख म्हणाले, “संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचा पुरस्कार करते. आग लावण्यापासून आग शमवण्यापर्यंतचे कार्य आम्ही केले आहे. शिवसेना आणि पतित पावन संघटना हातात हात घालून पुढे काम करत राहतील.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जोशी यांनी केले. मेळाव्यात “जय पतित पावन”, “जय एकनाथ शिंदे” या घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले.
