
पुणे दि. 10 : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुवर्णपदक विजेता पैलवान सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची लोहगावमधील पालावर भेट घेतली. या वेळी त्यांनी सनीच्या कामगिरीचे भरभरून कौतुक करत त्याचे पालकत्व स्वीकारले.पाटील यांनी सनीसाठी घर, सरावासाठी तालीम, शिक्षणासाठी मदत आणि स्वतःच्या पगारातून दरमहा ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
ते म्हणाले, “जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने सुवर्णपदक जिंकून देशाचा अभिमान वाढवला.”या प्रसंगी सनीचे प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे, भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॉबी टिंगरे, तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.
बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत सनीने इराण, इराक, जपान आणि कोरिया यांच्या खेळाडूंना पराभूत करत सुवर्णपदक जिंकले आणि भारताचा तिरंगा फडकावला.संघर्षातून यश मिळवणारा सनी आज तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.