
पुणे, दि. 9 : पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत वाढत असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील महिलांनी बिबट्यापासून स्वसंरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याचा अनोखा उपाय शोधला आहे.
बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो आणि नरडीचा घोट घेतो. त्यामुळे शेतात काम करताना स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून या महिलांनी कुत्र्यांसारखा टोकदार खिळ्यांचा लोखंडी पट्टा गळ्यात बांधायला सुरुवात केली आहे. शेतात रोज काम करावंच लागतं, पण बिबट्याच्या भीतीने तेही जीवावर येतं, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. अलीकडेच पिंपरखेड गावात १४ वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि वन विभागाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत.