
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर काहीही अशक्य नाही, हे सिद्ध केलं आहे पुण्यातील लोहगावमधील झोपडीत राहणाऱ्या सनी फुलमाळी या १७ वर्षीय कुस्तीपटूने. बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत (Asian Youth Wrestling Championship) ६० किलो वजनी गटात सनीने सुवर्णपदक पटकावलं असून, त्याच्या या यशाने संपूर्ण पुण्याचा अभिमान वाढवला आहे.
सनीचे वडील सुभाष फुलमाळी नंदी बैल घेऊन गावात फिरून उपजीविका करतात. स्वतःला कुस्ती क्षेत्रात नाव कमवता आलं नाही, पण आपल्या तीन मुलांनी कुस्तीमध्ये यश मिळवावं या हेतूने त्यांनी घराबाहेरच कुस्तीचं मैदान तयार केलं. त्या मातीच्या अखाड्यात सुरू झालेला सनीचा प्रवास थेट बहरीनमधील आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला.
सनीच्या मेहनतीने आणि जिद्दीने प्रभावित होऊन संदीप भोंडवे यांनी त्याला दत्तक घेतलं आणि मागील आठ वर्षांपासून प्रशिक्षण, आहार आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला. रोज सकाळ-संध्याकाळ सराव, शाळा आणि त्याचबरोबर आई-वडिलांचे संघर्ष पाहत सनीने स्वतःचं ध्येय ठरवलं — “कुस्तीच्या जगात भारताचं नाव उजळवायचं.”
सनीने एकामागून एक स्थानिक आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवला आणि अखेर त्याची निवड आशियाई युवा कुस्ती स्पर्धेसाठी झाली. बहरीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत सनीने इराण, इराक, जपान, कोरिया अशा बलाढ्य देशांच्या खेळाडूंशी कुस्ती करत सुवर्णपदक जिंकत भारताचा तिरंगा फडकावला.
या अभूतपूर्व यशानंतर सनी फुलमाळीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघर्षातून उभं राहून यश मिळवणारा सनी आज तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.