
पुणे दि. 9 : पुण्यात स्वतःचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकांसाठी अपूर्णच राहतं. पण आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देत आहे.
पुण्यातील प्रमुख आणि विकसित भागांमध्ये ही घरे उपलब्ध असून, म्हाडाच्या लॉटरीनुसार घरांची किंमत २८.४२ लाख ते २८.७४ लाख रुपये इतकी आहे. याच परिसरातील इतर प्रकल्पांमधील घरांच्या किमती ८० ते ९० लाख रुपयांपर्यंत असल्याने म्हाडाची ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
म्हाडाच्या लॉटरीतील घरांची किंमत बाजारभावापेक्षा तब्बल ६० ते ७० लाखांनी कमी आहे, त्यामुळे घरखरेदीदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया देखील सोपी आहे. इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन “पुणे बोर्ड लॉटरी २०२५” हा पर्याय निवडावा. त्यानंतर ‘यशविन आर्बो सेंट्रो’ हा प्रकल्प निवडून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२५, रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.